Rajesh Patil Collector

Rajesh Patil Collector Story

ताई, मी कलेक्टर व्हयनू ...श्री राजेश पाटील .I A S ..मु पो ताडे ,जळगाव

भाजीपाला..तर कधी ..ब्रेड विकून ...मजुरी करून ..जिल्हाधिकारी झालेले .

भोवती अंधार होता. पण या काळ्याकुट्ट अंधारातही जिद्दीची एक ज्योत तेवत होती. ती होती शिकण्याची जिद्द. जळगाव जिल्ह्यातल्या ताडे नावाच्या छोट्याशा खेड्यातून सुरू झालेली ही जिद्दीची कथा ओरिसातल्या कोरापूत जिल्ह्यापर्यंत जाऊन पोचली आहे. या जिद्दीचं नाव आहे राजेश पाटील. नक्शलवादी कारवायांमुळे गाजत असलेल्या जिल्ह्यांमध्ये बस्तर, दंतेवाडा यांच्यासोबतच ज्या कोरापूतचं नाव घेतलं जात होतं त्या आदिवासी जिल्ह्याचं नशीब या राजेश पाटीलमुळेच बदलू लागलं आहे. आज तिथे तो जिल्हाधिकारी बनून येणाऱ्या संकटांची तमा न बाळगता विकासाची गंगा आदिवासी पाड्यांवर नेण्यासाठी झटतो आहे

राजेश आता कोरापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. नक्षलवाद्यांशी कठोरपणे सामना करतानाच सामान्यांशी तितक्याच प्रेमाने वागणारा अधिकारी म्हणून त्याचा ओरिसात नावलौकिक आहे. आणि इकडे त्याचं 'ताई, मी कलेक्टर व्हयनू' शाळा-कॉलेजातल्या मुलांना झपाटून टाकतं आहे. २००५ साली यूपीएससी परीक्षेत उत्तम गुण मिळवत आयएएस होण्याचा मान मिळवणाऱ्या राजेशने जिल्हाधिकारी होईपर्यंतचा प्रवास चितारणारं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला नाव दिलं, 'ताई, मी कलेक्टर व्हयनू'. आपल्या आईला तो ताई म्हणतो. ह्या ताईनेच त्याच्यात जिद्द पेरली. ही बाई कणखर होती. आयुष्यभर तिने कष्ट उपसले होते. पण ह्या कष्टांची कधी लाज वाटू न देण्याचे आणि सचोटीने जगण्याचे संस्कार तिने आपल्या मुलावर केले. तिलाच त्याने आपला संघर्षमय प्रवास आणि गाठलेलं ध्येय यांची गोष्ट सांगितली आहे.

तो जन्मला एका गरीब शेतकरी कुटुंबात. दारिद्य पाचवीला पुजलेलं आणि कर्जबाजारीपणाने अख्खं घर पिचलेलं. घरच्यांसोबत मजुरीला जावं लागे. विहिरीच्या खोदकामापासून शेतावर राबण्यापर्यंत कुठच्याही कामाला नाही म्हणायची चैन परवडणारी नव्हती. कधी तो भाजीपाला विकायचा तर कधी ब्रेड विकून घरच्या जमाखर्चाला हातभार लावायचा. साध्यासुध्या गरजा देखील स्वप्नवत वाटायच्या. प्रचंड हलाखी होती. रोज तब्बल १३ किमीचा प्रवास करीत राजेशने माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. बऱ्या, वाईट मित्रांच्या संगतीत उनाडक्या केल्या, पण त्याबदल्यात बेदम मारही खाल्ला. आईचं लक्ष होतंच. त्यामुळे दिशा भरकटली नाही. शाळेत असतानाच वाचनाची आवड लागली. रामायण, महाभारत, गोष्टीची पुस्तकं, कादंबऱ्या जे मिळेल ते वाचत गेला. पण त्याच्या मनावर परिणाम केला तो शिवाजी महाराज, भगतसिंग, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या चरित्रांनी. शिवाजी महाराज, भगतसिंग यांच्या शौर्यातून कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत हार न मानण्याची प्रेरणा मिळाली.

पुणे विद्यापीठात राजेशला त्याच्या स्वप्नपूर्ततेसाठी आदर्श वातावरण मिळालं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत त्याने नावनोंदणी केली. त्यानंतर सीएसआयई-नेट/सेट ची परीक्षा तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. सीडीएसमधून भारतीय हवाई दलातही त्याची निवड झाली. पण त्याचवेळी आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळही राजेशवर आली. कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरी पत्करणं किंवा आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास सुरू ठेवणं हे दोन पर्याय त्याच्यासमोर होते. भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण होत तो क्लास वन ऑफिसर बनला. कुटुबांची जबाबदारी सांभाळल्यानंतर आयएएस होण्यासाठी राजेशने प्रयत्न सुरू केले. पण नोकरीतल्या व्यस्ततेमुळे अभ्यासाला वेळ देणं कठीण झालं. अर्धवट तयारीमुळे कधी पूर्वपरीक्षा, कधी मुख्यपरीक्षा तर कधी मुलाखतीत नापास केलं गेलं. पण अडचणी जशा वाढत गेल्या तशी त्याची इच्छाशक्ती बुलंद होत गेली. शेवटी तो दिवस उजाडला. ११ मे २००५. त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. त्यादिवशी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातला हा मुलगा चक्क आयएएस बनला होता. आजारपणात परीक्षा देत त्याने हे ध्येय गाठलं होतं.

Refrences: https://www.facebook.com/santoshd.patil.961/posts/10210443272100505

About the Author

srajsolutions